Mouj Diwali Ank 2025 (मौज दिवाळी अंक २०२५)Author/s:

२०२५च्या दीपावलीचे स्वागत उत्साहाने, उल्हसित मनाने करताना नि बरोबरीने, या वर्षीचा सकस साहित्याने सजलेला मौज दिवाळी अंक वाचकांसमोर ठेवताना हा आनंद द्विगुणित होत आहे. तसे तर हे वर्ष धकाधकीचे, अनिश्चितीचे सावट घेऊन आले. पाठोपाठच्या अस्मानी-सुलतानी संकटांनी विकसनशील भारताची स्वप्ने पाहणाऱ्या आपल्या देशाला या वर्षाने खरेतर हादरवूनच टाकले. काश्मिरमधला पर्यटकांवरचा दहशतवादी हल्ला, अहमदाबादजवळील एअर इंडियाची विमान दुर्घटना, महाराष्ट्रात आलेला ओला दुष्काळ, अमेरिकन सरकारने भारतावर लादलेले भरमसाट निर्यात कर…जगभरात दीर्घकाळ चालू असलेली रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण यांसारखी युद्धे…एक ना अनेक! तरीही मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या दिवाळी अंकांच्या परंपरेची झळाळी मात्र चिरंतन आणि मनाला उभारी देणारी आहे हेही तितकेच खरे !

२०२५च्या मौज दिवाळी अंकाची वैशिष्ट्यपूर्णता पाहताक्षणीच वाचकांच्या नजरेत येईल-संस्कृती, इतिहास, निसर्ग, विज्ञान, सामाजिक, आर्थिक पर्यावरण, अभिजात कला, व्यक्तिचित्रे अशा लेखनाच्या विविध नि व्यापक परिमितींना स्पर्श करणारा यंदाचा अंक आहे. शिवाय ज्येष्ठ लेखकांबरोबर नव्या, जाणकार लेखकांच्या प्रगल्भ लेखनाला अंकात आवर्जून दिलेले स्थानही वाचकांचे लक्ष वेधून घेईल.

विविध लेखांमध्ये प्रखर सामाजिक वास्तव टिपणारे लेख मौजमधे आहेत. यांतला एक प्रत्ययकारी लेख आहे, अबुजमाड पर्वतरांगेच्या परिसरातील नक्षलवाद्यांच्या विरोधात तिथल्या आदिवासींनी चळवळीच्या रूपात उभ्या केलेल्या तीव्र संघर्षावरचा देवेंद्र गावंडे यांचा. तर दुसरा आहे, एकेकाळी ‘फोर्ड फाउंडेशन’सारख्या संस्थेत काम करणाऱ्या अजित कानिटकर यांचा. विविध प्रकारचे सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचे काम पाहताना, तळागाळातील लोकांत मिसळून त्यांचे अवघड जगणे जवळून अनुभवताना आलेल्या संमिश्र अनुभवांचे त्यांचे कथन आपल्याला विचारप्रवृत्त करते आणि दुसरीकडे अंतर्मुखही. असेच एक स्त्री-पुरुष असमानतेचे आर्थिक वास्तव मांडले आहे अर्थतज्ञ रूपा रेगे-नित्सुरे यांनी. भारतासारख्या विकसनशील देशात आजही स्त्री-पुरुष यांच्या वेतनात असणारी असमानता अचंबित करणारी आहे.

– संपादक

In stock

Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.