एकदा उंबरठ्यावरचें माप ओलांडून आत गेल्यावर, ज्या काळी स्त्रियांना उंबरठ्याबाहेर डोकावून पाहणे ही मुष्कील असे, अशा काळात कादंबरीकार श्री. ज. जोशी आपल्याला घेऊन जात आहेत. अनेकार्थांनी क्रांतिकारी अशा, गेल्या शतकाच्या उत्तरार्धांतील एका कालखंडाच्या या कहाणीचे सूत्रधार गोपाळराव जोशी. काहीसे निष्ठुर, एककल्ली, चक्रम आणि व्रात्य. परंतु त्याचबरोबर आपली दुसरेपणाची तरुण बायको आनंदी हिने शिकून जग गाजवावें या भव्य कल्पनेने झपाटलेले.
सातासमुद्रापलीकडे एकट्याने प्रवास करून आनंदीबाईंनी डॉक्टरीची पदवी मिळविली; परंतु शारीरिक व मानसिक हालअपेष्टा सहन करून अमेरिकेंत वैद्यकाची संजीवनी विद्या मिळवित असतांनाच प्राणघातक रोगाचे बीज त्यांच्या देहात रुजले. त्यानेच डॉक्टरीणबाईंचा बळी घेतला.
श्री. जं. च्या ‘सदाशिव पेठी’ लेखणीने आपल्या कादंबरीच्या नायक-नायिकेच्या तोडीच्या जिद्दीनें भरारी मारून तत्कालीन अमेरिकेचे वातावरणहि आपल्या डोळ्यांपुढे हुबेहूब उभें केलेलें आहे. ज्या ब्राह्मणी संस्कृतीत लेखकाची पाळेंमुळें खोलवर गेलेली आहेत, तिच्याबद्दल अत:स्फूर्त समज तर ‘आनंदी गोपाळ’च्या पानापानांत आहेच; पण त्यालाच प्रचलित समाजस्थितीचा व ‘आनंदी गोपाळ’च्या चरित्राचा दीर्घ व्यासंग, अतिशय रसाळ अशी निवेदनशैली, आणि कथाविषयाचा वेगळेपणा अन् त्यांत ओतप्रोत भरून राहिलेलें नाट्य यांचीही जोड मिळालेली आहे.
Reviews
There are no reviews yet.