Chandrakant Diwali Ank 2025 (चंद्रकांत दिवाळी अंक २०२५)Author/s: Multiple Authors
In stock
चंद्रकांत दिवाळी अंकाची वाचक आतुरतेने वाट पाहत असतात ही कल्पनाच ह्या अंकाला उर्जा देणारी असते आणि म्हणूनच अंकाचा दर्जा टिकवून ठेवण्याची जबाबदारी आव्हान वाढवणारी असते. वाचकांना प्रतीक्षा असते ती यातील कादंबऱ्यांची. दर वर्षी चंद्रकांतमध्ये वेगवेगळ्या विषयावरील कादंबऱ्यांचा समावेश असतो. लेखकांसोबत विषयांच्या वैविध्यालाही हा अंक प्राधान्य देत असल्याने निवडीबाबत चोखंदळ असावं लागतं. त्यातही चंद्रकांतची ६२ वर्षांची यशस्वी वाटचाल आणि वाचकांच्या अपेक्षा याचं योग्य भान ठेवणं ओघाने येतंच. याही वर्षी कादंबऱ्यांचं मुक्तपीठ समजला जाणारा चंद्रकांत पाच कादंबऱ्यांनी सजलेला आहे.
अनंत सामंत यांची मनस्वी वागणारी, प्रेमाला फक्त प्रेमाचाच पर्याय मानणारी स्वप्नाळू वृत्तीची टूली, तिच्या निरागस प्रेमाचा अंतस्थ अनुभव देऊन जाईल, त्यांच्या ‘टूली’ या कादंबरीतून. सिडने शेल्डन यांच्या ‘इफ टुमॉरो कम्स’ या कादंबरीचा ‘बिकट वाट वळणांची’ हा माधुरी तळवलकर यांनी केलेला संक्षिप्त अनुवाद म्हणजे एका स्त्रीच्या सरळ रेषेत चाललेल्या आयुष्यात अचानक घडलेल्या घटनांमुळे तिच्या वाट्याला येणारा विश्वासघात आणि त्याचा सूड घेण्यासाठी तिने नाईलाजाने परंतु जाणीवपूर्वक अवलंबिलेला मार्ग तिच्या व्यक्तिमत्त्वात कसा बदल घडवतो याची उत्कंठावर्धक कहाणी यात आपल्याला वाचायला मिळेल. दर चार वर्षांनी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने १९८० मधे शहर शुद्धीकरण मोहीम हाती घेतलेल्या दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांनी त्यांच्या सचिवाच्या सहाय्याने गरीब कष्टकरी लोकांना डांबून केलेला नृशंस छळ, सत्ताधाऱ्यांचं क्रौर्य आणि गरिबांची अगतिकता यावर प्रकाश टाकणारी उमेश कदम यांची ‘ब्रदर्स होम’ ही कादंबरी वेगळा विषय घेऊन आली आहे. ‘मिशन अननोन’ ही पु. रा. रामदासी यांची अनेक अतर्क्य घटनांनी भरलेली कादंबरी देखील उत्कंठावर्धक आहे.
या सोबत ‘वैदिक देवता ते अष्टदिक्पाल’- दीपा मंडलिक, ‘यशामागे धावता…’- अनिल पाटील, ‘व्याख्या बदलावी लागेल’- अनुराधा नेरुरकर, ‘गोष्ट कोविड लशीची कहाणी कतालिनाची’ – चित्रा नित्सुरे, ‘ऑपरेशन पोस्टमास्टर’ – शैलेंद्र शिर्के, ‘लोकशाहीचा पूजक – बॅ. नाथ पै’ – मं. गो. राजाध्यक्ष अशा भिन्न विषयांवरील लेखांचा आस्वादही घेता येणार आहे. यातील आणखी एक आकर्षण म्हणजे गिरीश देसाई यांनी जरा हटके पद्धतीने केलेल्या कोलंबियाच्या भेटीचे रंजक प्रवासवर्णन. दरवर्षी अंकाची शोभा वाढवणाऱ्या दिगंबर गाडगीळांच्या ‘चौकटी’ याही वर्षी असणार आहेत. अनीश दाते यांची अंतर्गत सजावट आणि चंद्रशेखर बेगमपुरे यांचं आकर्षक मुखपृष्ठ अंकाची शोभा वाढवणार आहेतच. अशा निवडक, दर्जेदार साहित्याने परिपूर्ण वाचन फराळ असलेला आणि सर्वांगाने उत्सवोत्सुक असलेला हा दिवाळी अंक वाचकांच्या हातात देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आनंददायी आणि आरोग्यदायी दिवाळीसाठी वाचकांनाही खूप शुभेच्छा. आपल्या अभिप्रायांचे नेहेमीच स्वागत असेल.
– नीलिमा राजेंद्र कुलकर्णी
– अनुराधा नेरुरकर

Reviews
There are no reviews yet.