Maher Diwali Ank 2026 (माहेर दिवाळी अंक 2026)Author/s:

‘माहेर’चा यंदाचा दिवाळी अंक परंपरेला साजेसाच! सिद्धहस्त लेखकांबरोबरच नव्या लेखकांच्या कथा-लेखांनी सजलेला साहित्याचा नजराणा घेऊन येत आहे….
इथे थबकला काळ शेवटचा पेपर राहिला होता. तो केव्हा होईल सांगता येत नव्हतं. एकवीस दिवस कुणीही कुठेही जाऊ शकणार नाही, असं सरकारनं जाहीर केलं होतं. शाळा-कॉलेजेस बंद झाली होती. त्यामुळे उरलेल्या पेपरची तयारी करण्याचा उरलासुरला रेटा पार मावळून गेला. आणि मग लॉक डाऊनची मुदत वाढतच गेली. लॉक डाऊनमुळे एक मात्र झालं. निवांत वेळ मिळाला. ज्या गोष्टी करायला आजवर वेळ मिळाला नव्हता, त्या गोष्टी करता आल्या. कम्प्युटरचा वापर पूर्वी तो करत होता, पण ते जुजबी होतं. या काळात त्यानं कितीतरी नव्या गोष्टी ऑनलाईन शिकून घेतल्या. अगदी ग्राफिक्सपासून ते कोडिंगपर्यंत….. लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या काळाबद्दलची डॉ. अनघा केसकर यांची ओघवत्या शैलीतली दीर्घ कथा.

जंगल अजून जिवंत आहे…..तो त्या आटलेल्या पाणवठ्याजवळ पुन्हा गेला. मृत माकडी अजून तिथेच उभी होती. पिल्लू तिच्या जवळ बसलं होतं. दिवसभरात कदाचित त्याला समजलं असावं, की आई आता उठणार नाही. पण ते दूरही जात नव्हतं. गणू काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला, त्याला त्याच्या मुलीची आठवण झाली. ती लहान असताना तो ड्युटीवरून घरी आला, की ती धावत येऊन गळ्यात पडायची….प्रदूषणामुळे जंगलांवर आणि तिथल्या प्राण्यांवर होणाऱ्या परिणामांची क्षिप्रा डाखोडे – देशमुख यांची कथा.
माझ्या आजीची गोष्ट तिनं तीन पिढ्या पाहिल्या. सर्वांशी जुळवून घेतलं. परिस्थितीतले चढ-उतार पाहिले, सुखदुःखं पाहिली; पण कधीही डगमगली नाही. बदलत्या वातावरणात तिनं स्वतःलाही बदलवलं, ती सहनशील माउली म्हणजे माझी आजी. वडलांची आई. आम्ही तिला ‘काकू’ म्हणायचो. तिचं नाव सुभद्रा, पण तिच्या आयुष्यात भाग्याचे क्षण आलेच नाहीत. ती विकेशा होती. माझे मित्र तिला पेशवाईतली आजी म्हणायचे. काकूला जाऊन सत्तावीस वर्षं झाली; पण तिची ती मूर्ती डोळ्यांसमोर अजूनही तशीच उभी आहे. प्रा. मिलिंद जोशी उलगडत आहेत आपल्या आजीच्या भावस्पर्शी स्मृती.
खेजरी साथ हो जावे, सुख रो लागे राग… राजस्थानात सौर ऊर्जा प्रकल्पासाठी खेजरीच्या झाडांची प्रचंड तोड झाल्याच्या बातम्या आणि बरेच लेख झरझर डोळ्यांखालून जात होते. ही कत्तल पाहताना वाचताना, कित्येक वर्षांपूर्वी, घरामागच्या अंगणातलं उंबराचं झाड कापल्यावर वाटलेल्या माझ्या त्या अस्वस्थतेचा धागा या राजस्थानातल्या अनोळखी लोकांच्या दुःखाशी जुळतो आहे, असं वाटलं. विकासकामांसाठी होणारी बेसुमार वृक्षतोड या ज्वलंत प्रश्नावर पोटतिडकेतून लिहिलेला वर्षा गजेंद्रगडकर यांचा लेख.याचबरोबर स्वाती राजे, डॉ. नंदू मुलमुले शुभांगी पाथरकर, श्रीपाद टेंबे, अकल्पिता जोशी- करेकट्टी, प्राची जावडेकर, पु. रा. रामदासी, विजय लोणकर, रवी देशमुख आदी लेखक-लेखिकांचे वाचनीय लेख आणि कथा, शिवाय वार्षिक राशीभविष्य…..

Out of stock